Friday, September 27, 2019

MAHA VIDHAN SABHA : द्विभाषिक राज्याची पहिली निवडणूक आणि महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’

महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचा बिगुल नुकताच वाजला आहे. संपूर्ण राज्यभर निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. १९६० मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्राने अनेक चढउतार पाहिले आहेत. १९६० मधील पहिल्या विधानसभेपासून ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या तेराव्या विधानसभा निवडणुकीपर्यंतचा राज्याच्या जडणघडणीचा प्रवासही अनेक वळणांनी झाला आहे. राज्याच्या मंगल कलशानंतर एकंदर वाटचालीतील महत्वपूर्ण घटनांचा धांडोळा आपण घेणार आहोत ‘झरोका’ या लेखमालिकेतून..


मुंबई - तब्बल दोन दशकांच्या संघर्षानंतर व १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र निर्मितीचा मंगलकलश दिल्लीतून राज्यात आणला. मुंबई द्विभाषिक राज्यातून आपापली भाषा बोलणारी स्वतंत्र राज्ये स्थापण्यासाठी गुजराती आणि मराठी लोकांनी प्रयत्न सुरु केले. मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि गुजराती भाषिकांनी महागुजरात चळवळीतून ही मागणी लावून धरली आणि अखेर १ मे १९६० रोजी या दोन राज्याची विभागणी झाली.

द्वैभाषिक राज्य –
१ नोव्हेंबर १९५६ रोजी मराठी व गुजराती भाषिकांचे विशाल द्वैभाषिक राज्य अस्तित्वात आले. यशवंतराव चव्हाण या द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. या द्वैभाषिक मुंबई राज्यात कच्छ, सौराष्ट्र या गुजराती भाषिक प्रदेशांबरोबरच हैद्राबाद संस्थानातील मराठी भाषिकांचा मराठवाडा हा भाग तसेच मध्य प्रदेशातील विदर्भ किंवा वऱ्हाड हा भाग सामील होता.


द्वैभाषिक राज्याची सार्वत्रिक निवडणूक (१९५७) -
काँग्रेसच्या धोरणामुळे राज्यातील जनमत विरोधात गेले होते. या निवडणुकीत काँग्रेसला लोकसभेच्या ४४ पैकी २१ आणि विधानसभेच्या २६४ पैकी केवळ १३५ ठिकाणीच विजय मिळाला. या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने निवडणुकीत भाग घेतला व काँग्रेसच्या वर्चस्वाला जबरदस्त हादरा दिला. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई शहर व कोकणात समितीने जोरदार मुसंडी मारत चांगले यश मिळाले. परंतु काठावरचे बहुमत घेऊन सरकार काँग्रेसचेच आले व यशवंतराव चव्हाण द्विभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यामुळे १९५७ च्या निवडणुकीने द्विभाषिक मुंबई राज्य अमान्य असल्याचा व स्वतंत्र मराठी भाषिक राज्यासाठी स्पष्ट कौल दिला. जनतेच्या रेठ्यापुढे नमते घेऊन काँग्रेसला स्वतंत्र महाराष्ट्र राज्यासाठी मान्यता देणे भाग पडले.
तब्बल दोन दशकांच्या संघर्षानंतर व १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र निर्मितीचा मंगलकलश दिल्लीतून राज्यात आणला. भारताच्या स्वतंत्र्यानंतर भाषावर राज्यनिर्मितीची मागणी जोर धरू लागली. मुंबई द्विभाषिक राज्यातून आपापली भाषा बोलणारी स्वतंत्र राज्ये स्थापण्यासाठी गुजराती आणि मराठी लोकांनी प्रयत्न सुरु केले. मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि गुजराती भाषिकांनी महागुजरात चळवळीतून ही मागणी लावून धरली आणि अखेर १ मे १९६० रोजी या दोन राज्याची विभागणी झाली.


१९६० मध्ये महाराष्ट्राची पहिली नवनिर्मित विधानसभा अस्तित्वात आली. त्यामध्ये मुंबई द्वैभाषिक राज्य व हैदराबाद क्षेत्रातील सदस्यांचा समावेश होता. ही तडजोड तात्पुरती होती व या आधारावर महाराष्ट्र विधानसभेचे कार्य सुरू करण्यात आले.

संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती-

१ मे १९६० रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली. अशा प्रकारे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्याचे तमाम मराठी जनतेचे स्वप्न अखेरीस साकार झाले. द्वैभाषिक मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेच स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.

१९४९ ते १९५२ या कालावधीत मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर निवडले गेले होते. त्यानंतर मोरारजी देसाई यांनी चार वर्षांसाठी हे पद सांभाळले. १९५६ ते १९६० या चार वर्षांमध्ये यशवंतराव चव्हाण मुंबईचे मुख्यमंत्री होते आणि 1960 साली नव्या आणि आज अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री झाले.

1956 साली मुंबई राज्याच्या राज्यपालपदी श्रीप्रकाश यांची नियुक्ती झाली होती. श्रीप्रकाश या पदावरती 1962 पर्यंत असल्यामुळे आजच्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होण्याचा मान त्यांच्याकडे जातो.

No comments:

Post a Comment